Goshtarang Tour
पालघर दौरा
वर्दी, गर्दी आणि दर्दी. आत्तापर्यंत गोष्टरंगच्या दोन्ही टीम्सने सोनाळ्याजवळच्या बहुतेक सर्वच शाळांत प्रयोग केले. पण कोणत्याही प्रयोगाच्या जागी नुसते गाडीतून उतरलो, शाळा लांबून पाहिली तरी मुलं गोळा होतात आणि मन लावून पाहत राहतात, लाजत हसत राहतात, खूश होतात. हे सगळं आमच्या ग्रे वर्दीमुळे होतं. असे कपडे घातलेले लोक येतात आणि तास दीड तास भरपूर हसायला खेळायला गायला मिळतं हे इथल्या पोरांना आता कळलं आहे.
इथे झालेल्या थोड्याशा प्रयोगांत आम्ही अंदाजे ४०० मुलांपर्यंत पोहोचलो आणि ४०० टाळ्यांचा आवाज आम्ही ऐकला. त्या टाळ्यांमध्ये त्यांची मनापासूनची दाद असते. आमच्यातल्या सर्वांनी ती एवढ्या मोठ्या प्रेक्षकांची दाद पहिल्यांदाच ऐकली असावी.
मूल पाहणार ऐकणार म्हणजे ते किती मन लावून असेल? फार नाही. प्रयोगातले काही accidents त्याला कळणार सुद्धा नाहीत, असा माझा समज होता जो ह्याच काही प्रयोगात पूर्ण संपला. मूल एकूणएक डिटेल सांगते, सर्व बारकाव्यांसहित. इथल्या मुलांना दुसरं कोणतं मनोरंजनाचं साधन नाही, मग गोष्टरंग ही एक मोठी जबाबदारी होऊन बसते. प्रत्येक मूल महत्त्वाचं असतं, ते जे पाहतंय, ऐकतं आहे त्याचा पुढचा किमान आठवडाभर त्याच्यावर परिणाम असतो. दोन्ही गोष्टीतली गाणी मुलं प्रयोग झाल्या झाल्या म्हणत फिरत असतात. आम्ही निघताना आम्हाला हसून टाटा करतात. त्यांच्यात Thank you असंच म्हणतात. हे हसू पुढे मिळत राहावं इतकंच.
आता आम्ही मोठ्या २० दिवसांच्या दौऱ्यावर निघणार आहोत. २५-२५ प्रयोगांचा अवाढव्य प्लॅन तयार आहे. भेटू या लवकरच.
मयूर, गोष्टरंग फेलो २०२३-२४
बेळगांव दौरा
नमस्कार मंडळी!
गोष्टरंगचा बेळगांव दौरा २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान जोरदार उत्साहात पार पडला. यात ‘वाढदिवसाचे चॉकलेट’ आणि ‘गीत का कमाल’ या गोष्टी गोष्टरंग फेलोजनी सादर केल्या.
काय मुलांचा उत्साह, काय तो निरागसपणा, बापरे रे बाप! गोष्टींना मिळणारा मुलांचा प्रचंड प्रतिसाद, गोष्टी सादर झाल्यावर त्यांचं येऊन भेटणं प्रत्येक वेळी भारावून टाकणारंच असतं. कधी मुलांच्या प्रतिसादाने reaction बदलाव्या लागत होत्या तर कधी dialogue! सगळ्या शाळांमधला मुलांचा आकडा २५०-३०० च्या घरात होता. शेवटच्या प्रयोगावेळी ५०० मुलं होती. सगळ्यांना आम्हा तिघांशी हात मिळवायचाच होता. “खूप छान नाटक केलं, मला फार आवडलं” असं म्हणताना ते छोटेसे हात अलगद हात मिळवून जात होते, मिठी मारत होते, गालाला हात लावून जात होते; तेव्हाचा त्यांचा चिमुकला स्पर्श, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझा आनंदही सांगता येणार नाही इतका खास!
के. एल. एस. स्कूलमधल्या काही मुलांनी तर autograph घेतले. “सांभाळून जा,” म्हणून ५ वर्षांचा मुलगा सांगत होता! त्याच शाळेत दोन मुली मला सोडायलाच तयार नव्हत्या. “ताई तू जाऊ नको, आमच्या घरी चल,” हेच चाललं होतं सारखं. “तुमच्या घरी तुमची वाट पाहतायत तशी आमच्याही घरी आमची वाट पाहतायत. उशीर झाला तर तुम्हाला आवडेल का मला ओरडलेलं?”असं सांगितल्यावर “उद्या नक्की ये” म्हणून त्यांनी मला जरा नाईलाजानेच सोडलं. अशा वेळी खूप जीवावर येतं, पण पर्याय नाही. प्रवास अर्थात प्रत्येकाचा स्वतःच्या दिशेने चालूच असतो पण या दोन मुली मी विसरणं शक्यच नाही, ज्या कदाचित अजूनही त्यांच्या शाळेत माझी वाट पाहत असतील!हा दौरा यशस्वी करण्यात ज्या लोकांचा हातभार लागला, त्या सर्व शाळांमधल्या मुख्याध्यापिका, शिक्षक, आमच्या पाण्याची, स्वच्छतेची सोय करणारे हेल्पर्स, गार्ड्स आणि स्थानिक मंडळी, खुला आस्मान संस्था यांचे मनापासून आभार. हा सगळा emotional touch, मुलांचं प्रेम, स्थानिक लोकांचं प्रेम घेऊन, बेळगांवची स्पेशल हुग्गी आणि बेन्नी डोसा चाखून बेळगांवहून आम्ही आजच कोकणची वाट धरलीय. कश्याक? अहो, कश्याक काय कश्याक… तुमका भेटुक येतोव… तुम्ही तयार ऱ्हवा…गोष्टरंगबुंगबँग_बुंग करुक… दामिनी जयश्री राजेंद्र, गोष्टरंग फेलो २०२३-२४
अमरावती आणि यवतमाळ दौरा
Goshtarang @ Amravati & Yavatmal
“दादा, अजून एक नाटक कर नं”, “चला नं आमच्या घरी जेवाले”, “आज थांबा नं आमच्या गावात”, “तुमचा फोन नंबर द्या न”, “अजून येणार नं वापस? खरंखरं सांग, दादा”
अमरावती आणि यवतमाळचा दौरा संपत आला आणि असे असंख्य आवाज डोक्यात घुमायला लागले.
तिवसा आणि नेर तालुक्यातली बहुतांश मुलं त्यांच्या आयुष्यातलं पहिलं नाटक बघत होती. प्रत्येक पात्र, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक संवाद… त्यांच्यासाठी सगळं जादुई होतं. नाटकाचे शिष्टाचार गळून पडले होते, उरला होता तो केवळ निखळ आनंद. ‘गीत का कमाल’ या नाटकात चोर येतात तेव्हा सावधान करायला २ मुलं चालू प्रसंगात थेट चालत आली. ‘वाढदिवसाचे चॉकलेट’ च्या सगळ्या पात्रांवरोबर मुलं गप्पा मारत होती. हे सगळं आम्हाला खूप नवीन होतं. अशा प्रसंगात सांभाळून घेऊन नाटक पुढे सुरू ठेवायचं असतं तेव्हा परीक्षा असते, पण आम्हाला मार्ग सापडत गेले.
गोष्टीमधले रंग मुलांच्या चेहऱ्यावर हळूहळू उमटत जातात. प्रयोग संपल्यावर मुलं मिठी मारतात, हात मिळवतात, सोडता सोडत नाहीत. आमची गाडी निघाल्यावर सगळे टाटा बाय बाय करतात तेव्हा भरून येतं. गोष्टरंगची ताकद प्रत्येक प्रयोगादरम्यान नव्याने अनुभवायला मिळते.
अशा प्रकारे २१ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट दरम्यान गोष्टरंगचा अमरावती – यवतमाळ दौरा पार पडला. जिल्हा परिषद शाळांमधले मुख्याध्यापक, शिक्षक आणि सर्व कर्मचाऱ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. Quest च्या पालवी टीमने आमच्या प्रयोगांचं सुंदर व्यवस्थापन केलं. सर्वांचे मनापासून आभार. आता आमची गाडी निघाली आहे गडचिरोलीला…भेटू या… गोष्टरंगबुंगबँग_बुंग ~ योगेश्वर, गोष्टरंग फेलो, २०२३-२४
कोकण दौरा (सिंधुदुर्ग, रत्नागिरी)
Goshtarang @ Konkan गोष्टरंगचा कोकण दौरा काल संपला. ह्या दौऱ्यात आम्ही एकूण बारा प्रयोग केले. काही सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर काही रत्नागिरीमध्ये.
इथली मुलं आम्हाला पाहिल्यावर बावचळून जायची. अगदी मोठी मुलंही खाली बघून हसायची, काही विचारलं की एकमेकांकडे बघायची. आम्ही त्यांना परग्रहावरचे वाटत असणार… पण हे सगळं फक्त पहिली सूचना देईपर्यंतच. ती सूचना असायची,
“आम्ही शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी आता दीड तास मुलांकडे दुर्लक्ष करावं, आम्ही त्यांना सांभाळू. तुम्हीही नाटक एन्जॉय करा. मुलांनो, आता आपण भरपूर दंगा करणार आहोत, तयार….?”
ही सूचना दिली की सगळी चिलीपिली अगदी पोटातून ‘होsss’ असं म्हणायची.
पुढचा प्रयोग ‘आपण अशी सूचना द्यायला नको होती का?’ असा प्रश्न पडण्याइतकी मुलं आमच्यासोबत खुलायची. मुलांना सूट दिली की त्यांना बरं वाटतं. त्या सूचनेमुळे कधीही आमची तनतन झाली नाही. त्यांना शांत करण्यासाठी दुसरी पण एक सूचना तयार ठेवली होतीच. ह्या सगळ्या सूचनापुराणातून एक जाणवलं की मुलं भरपूर हुशार होती, कसलीही कल्पना करायला ती कचरत नव्हती. त्यांना जेव्हा कळलं की हा दीड तास मजेचा, दंग्याचा, गोष्टी-गाण्याचा होता तेव्हा प्रत्येक मूल आपोआप हुशार झालं.
एक शिक्षक म्हणाले की, ह्यातली काही मुलं वर्गात अजिबात बोलत नाहीत, ढिम्म बसून राहतात, आज पहिल्यांदा त्यांना हसताना बघितलं आम्ही. कोकण दौऱ्याचं हे बक्षीस.
यांच्याशिवाय कोकण दौरा शक्य नव्हता :
नंदकिशोर उचले-फोंडा, प्रसाद भाईशेटे-लांजा, दुर्वा भाईशेटे-लांजा, मनोज रावराणे-लौरे, अजय रावराणे-लौरे, वामन पंडित-कणकवली, राजेंद्र चव्हाण-शिरगाव, केणी मॅडम-फोंडा, सचिन तायशेटे, आनंद माऱ्ये, चिंदरकर मॅडम, शुभम बाईत, पृथ्वीराज बर्डे, प्रिया सरुडकर, चंद्रकांत पावसकर, समीक्षा कामत, नंदू पाटोळे
आजपासून कोल्हापूर दौरा सुरू होतोय. पोरांना मजा यावी इतकंच.
मयुर (गोष्टरंग फेलो,२०२३-२४)
गडचिरोली दौरा
Goshtarang @ Gadchiroli घनदाट, दुर्गम, अनवट हे शब्द आम्ही सगळ्यांनी ऐकले होते, पण गडचिरोली दौरा सुरू असताना आम्हाला या शब्दांची प्रत्यक्ष अनुभूती आली. आम्ही तिघे पहिल्यांदाच विदर्भात आलो, वैनगंगा नदीचं पात्र ओलांडल्यावर गडचिरोली जिल्हा सुरू होतो. इथला भूगोल, इथली संस्कृती, भाषा, राहणीमान सगळं आमच्यासाठी नवीन होतं.
जंगलातल्या अरुंद रस्त्यावरून आमची गाडी रोज सकाळी एका नवीन शाळेकडे रवाना व्हायची. किर्र शांतता, शून्य रहदारी… पण एकदा का शाळेत पोहोचलो आणि नाटक सुरू केलं की मग मजा असायची. आम्ही त्यांच्या शाळांना नाट्यगृह बनवून प्रयोग सुरू करायचो. काही मुलं अबोल होती, काही मुलं चांगला प्रतिसाद द्यायची आणि काही मुलं इतकी धमाल करायची की त्यांना सांभाळणं कठीण व्हायचं. नाटकातल्या एका प्रसंगात मी आणि योगेश्वर चोराच्या भूमिकेत असताना कापडाच्या मागे लपून बसतो, तेव्हा एक मुलगा अचानक धावत आला आणि कापड खाली करून आमच्याकडे पाहू लागला. मग आम्ही त्यालाही आमच्या नाटकाचा भाग करून घेतलं.
या दौऱ्याने आम्हाला महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकावर नेऊन आणलं. गडचिरोलीमधल्या पालवी टीमने आमची उत्तम व्यवस्था केली होती, आमची खूप काळजी घेतली, प्रवासादरम्यान गडचिरोलीबद्दल खूप माहिती सांगितली. आमचा दौरा यशस्वी होण्यामागे धानोरा तालुक्यातल्या जिल्हा परिषद शिक्षकांचा आणि अंगणवाडी सेविकांचा मोठा हात होता. सर्वांचे मनापासून आभार! गडचिरोलीला पुन्हा एकदा जायला आम्ही सगळे उत्सुक आहोत.
आता आमची गाडी आली आहे थेट पुण्यात… भेटू या
~ विकास, गोष्टरंग फेलो, 2023-24 गोष्टरंगबुंगबँग_बुंग
कोल्हापूर दौरा
Goshtarang कोल्हापूर दौरा १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर मध्ये एकूण १४ प्रयोग कोल्हापूर, अब्दुल्लाट, शिरदवाड आणि इचलकरंजीत ठरले होते.
Krayons school पासून श्रीगणेशा झाला. ह्या शाळेत आम्हाला हिंदीतून प्रयोग करायचा होता. हिंदीची तालीम उत्तम झाली होती, पण नाही म्हटलं तरी हिंदीतून हा पहिलाच प्रयोग होता. धाकधूक होतीच, पण मुलं येऊन बसली आणि सगळे सूर उत्तम लागत गेले. प्रयोगानंतर विचार केला की उगाचंच इतकं टेन्शन घेत होतो.
असाच विचार करायची संधी मिळाली जेव्हा आम्ही समर्थ विद्यामंदिर उचगावला प्रयोग केला. त्या शाळेमध्ये abled आणि disabled दोन्ही विद्यार्थी एकत्र शिकतात. “खरंच मदतीची गरज असेल, तरच मदत घ्यायची”, ही शिकवण घेऊन ती सगळी मुलं एकत्र शिकतात. व्हीलचेअर तयार करणं, शिवणकाम करणं, जेवण बनवणं हे त्या व्हीलचेअरवरच्या मुलांना करताना पाहिलं आणि पुन्हा एकदा स्वतःकडे नीट बघावंसं वाटलं.
आता प्रत्येक शाळेतील अनुभव सांगत बसलो तर तुम्ही थकाल, पण आम्ही नाही.
ज्यांच्या शिवाय कोल्हापूर दौरा होणं शक्य नव्हतं ते म्हणजे :
दीप्ती देशपांडे-कोल्हापूर, श्रीमाती लीला बापूसाहेब पाटील चॅरिटेबल ट्रस्ट-कोल्हापूर, जयंतीताई-कोल्हापूर, शैलेश सर-कोल्हापूर, सुचेताताई-कोल्हापूर, मुरलीधर परुळेकर-कोल्हापूर मुग्धा गोरे-कोल्हापूर, स्वाती उपाध्याय-कोल्हापूर, विनायक माळी-अब्दुल्लाट-सार्शा, वि. माळी-अब्दुल्लाट, वर्षाताई-अब्दुल्लाट, रेंदाळकर सर-इचलकरंजी, स्वामी सर-इचलकरंजी, रोहितदादा-इचलकरंजी, दामोदरदादा-इचलकरंजी. गोष्टरंगबुंगबँग_बुंग. ~ ऋषिकेश, गोष्टरंग फेलो, २०२३-२४
पुणे दौरा
Goshtarang पुणे दौरा समाप्त. १ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर मध्ये एकूण १० प्रयोग पुणे, शिळीम आणि नसरापुरात ठरले होते.
सिद्धीस हॉबी होम पासून पुण्यातील प्रयोगांना सुरुवात झाली. त्याच दिवशी संध्याकाळी गरवारे बालभवनला आमचा प्रयोग होता. त्यावेळी ३०० मुलं आणि त्यांचे पालक आमच्या समोर येऊन बसले. मुलांना जेव्हा विचारलं की तुम्ही कोणकोणती पुस्तकं वाचलीत तर फ्रँकलिन वगैरे अशी त्यांची उत्तरं होती. मुलं इतकं वाचतायत हे बघून आनंदच झाला. अजून आनंदाची बाब अशी की या प्रयोगाला माधुरी पुरंदरे सुद्धा आल्या होत्या. प्रयोगानंतर एक ते दीड तास त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या. ललित कला केंद्र आणि शिळीम इथली मुलंही फार इंटरेस्टिंग होती. दोन्ही ठिकाणी फार उत्स्फूर्त प्रतिसाद होता.
ज्यांच्या शिवाय पुणे दौरा होणं शक्य नव्हतं ते म्हणजे :
माधुरी चिदरवार – हडपसर, सुवर्णा सखदेव – गरवारे बालभवन, प्रवीण भोळे सर – ललित कला केंद्र, मयुरा डोळस, मंदार कुलकर्णी, सुरेखा कदम – विवेकानंद विद्यामंदिर, प्रभा गणेश – नूतन मराठी विद्यालय, नेत्रा मॅडम – हुजूरपागा इंग्लिश मिडीयम स्कूल, डॉक्टर दलाल, विक्रम कदम – नसरापूर
आमच्या या पूर्ण दौऱ्यात क्वेस्टच्या पुणे टीमने आम्हाला खूप सहकार्य केलं त्यासाठी त्यांचे मन:पूर्वक आभार. गोष्टरंगबुंगबँग_बुंग

सिन्नर दौरा
सिन्नरमध्ये पहिल्यांदाच गोष्टरंग दौरा होतो आहे. क्वेस्ट प्रकल्पामधून मुलांना शिक्षकांशिवाय शिकवायला येणारे क्वेस्टचे ताई दादा माहीत आहेत. त्यामुळे बाहेरच्या माणसांचं एक्सपोजर मुलांना आहे. पण आधी मुलांनी कधीही नाटक पाहिलेलं नाही. मुलांना विचारलं की गोष्ट पाहिलीये का? कुठे पाहिलीये? तर मोबाईल किंवा टीवी सांगतात. समोर जिवंत माणसांनी सादर केलेलं असं सगळीच मुलं पहिल्यांदा पाहत होती – तेही फक्त वर्गात नाही तर मैदानात, मंदिरात, ओट्यावर असं सगळेजण बसू शकतील अशा कोणत्याही जागेत.
हा दौरा माझ्यासाठी खास होता. कधीही समोरासमोर काहीही परफॉरमॅटिव्ह न पाहिलेली ही प्राथमिक शाळेतली मुलं फार निरागसपणे, जीव ओतून, टक लावून आम्ही काय बोलतो, कसे हलतो, काय काय करतो हे पाहत होती. त्यांच्यासाठी ते सगळं नवीन होतं. इतका नवाकोरा ऑडिएन्स मला पहिल्यांदा मिळाला!
~ विकी, गोष्टरंग फेलो 2023-24 Goshtarang #Storytelling
हिंगोली दौरा
#Goshtarang the power of #storytelling “लहानपणीच कशाततरी झपाटून जाणं चांगलं”असं एका पुस्तकात वाचलं होतं. मला जरा उशीर झाला पण आत्ताचं झपाटलेपण गिळता गिळता माझा रंग बदलून गेला यात काही विशेष नाही! सतत दौरे…नाटकांचे प्रयोग आणि आजूबाजूला मुलं असणं, त्यांच्यासोबत काम करणं यामुळे आयुष्यात खूप भारी काहीतरी करतोय हे सतत जाणवत असतं. प्रयोग झाल्यावर “दिदी तू नको ना जाऊ”, “तू थांबून जा ना”, “आमच्या घरी चाल ना मग”, “इथून कुठं जाणार?”,”तिकडंच मुक्काम का?”,”आता परत कधी येणार?” इतकं मोठ्या माणसांसारखे बोलतात ना पोरं तेव्हा कौतुक वाटतं याचं. पार गाडी निघेपर्यंत bye करत असतात. आता वाडा, सिन्नरचा दौरा करून, हिंगोलीतले प्रयोग उरकून applied theatre चे workshop घ्यायला आम्ही सुरुवात केलीय. Workshop घेण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव; पण आनंद दादाच्या सततच्या contact मध्ये असल्याने, त्याच्या सल्ल्याने सगळं व्यवस्थित चाललंय. गोष्टींना, workshop ला येणारा मुलांचा रिस्पॉन्स खूप काही शिकवून जातो आहे. सिन्नर जितकं सुंदर आणि प्रशस्त रस्त्यांचं, तसंच हिंगोलीही. परवाच औंढा नागनाथ मंदिरात जाऊन आलो. फार समाधान वाटलं. थोडक्यात सगळं काही पध्दतशीर चालू आहे; आणि महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांच्यात राहिल्याने आजकाल सूर सुनावणीचा नाही समजावणीचा लागतोय.
नंदुरबार दौरा
एकलव्यची पोरं गोष्टरंगचा नंदुरबार दौरा. शाळेचं नाव एकलव्य माध्यमिक विद्यालय. ‘खिशात ठेवता येईल एवढं चर्च आणि डोक्यावर घेता येईल एवढी शाळा’ चा प्रयोग दोनदा करायचा होता. पाचवीच्याच सहा तुकड्या त्यात कव्हर होणार होत्या. पहिल्या प्रयोगाला साधारण २५०-३०० मुलं. हॉलला एकच entrance होता. ३०० मुलं एकत्र दंगा करायला लागली. काही केल्या रांग होत नव्हती, आणि शिक्षकांचे आवाजही एवढ्या पोरांसमोर विरत होते. न राहवून आम्हाला आवाज चढवावा लागला. पुढे प्रयोगात आवाज लागेल का, अशी भीती ओरडल्यावर वाटली. पण असंही वाटलं की आपण बाहेरचे आहोत, आपल्या ओरडण्याने ते ऐकतील, आणि तसं त्यांनी ऐकलंही. मुलांना मग आम्ही तिघांनी शांत बसवून घेतलं. आता प्रयोगात ही शांत राहतील असं वाटलं. नाटक वेगळं, आणि नाटकाआधीची आणि नंतरची माणसं वेगळी, हे ह्या बारक्यांना सहज कळलं.मुलांना नाटक खूप आवडलं. त्यांनी आम्हाला तशी पत्र लगेच लिहिली आणि आणून दिली. नंतर जेवणाच्या सुट्टीत काही मुलं लाजत लाजत आली आणि आम्हाला न जेवता नुसतं बसलेलं पाहून त्यांचा डबा खायला देऊ लागली. त्यांचे छोटे डबे… ठरवून कमी खायला लागणार होतं, मुलांना पण जेवायचं होतं शेवटी. तरीही ‘घ्या ना, घ्या ना’ हे चालूच होतं. मुलं भारी असतात. प्रयोगाच्या वेळेस ती प्रयोगच पाहत असतात. नंतर आमच्याशी दोस्ती करतात. त्या त्या वेळी त्या त्या क्षणात असतात. मयुर, गोष्टरंग (२०२३-२०२४) #Goshtarang#Tour#Nandurbar#Storytelling#Inthemoment
सांगली व इस्लामपूर दौरा
२० ते २२ फेब्रुवारी २०२४ ह्या दरम्यान सांगलीतील पाच शाळांमध्ये गोष्टरंगचे प्रयोग झाले. पहिल्यांदाच ह्या शाळांमध्ये गोष्टरंगचे शो होत होते. आम्हाला इथे बोलावणारे आणि आमची उत्तम सोय करणारे बाळासाहेब लिंबिकाई सर Balasaheb Limbikai जितके उत्सुक होते तितकीच सगळ्या शाळांमधली मुलं आणि आम्हीसुध्दा. सगळया शाळांमधले प्रयोग्य उत्तम झाले. ‘खिशात ठेवता येईल एवढं चर्च आणि डोक्यावर घेता येईल एवढी शाळा’च्या वेळी सगळे खळखळून हसले तर ‘माच्छेर झोल’च्या वेळी शिक्षकांचे व मुलांचे डोळे पाणावले. आता आजपासून इस्लामपूरचा दौरा सुरू झालाय. नवीन जागा आणि तितकीच उत्सुकता. इस्लामपूरच्या प्रयोगाचं नियोजन TMRE फेलो सुरज उर्मिला सुनील करतोय. फक्त शोच नाही तर आम्हाला इस्लामपूर कसं नीट बघता येईल याची सुद्धा जबाबदारी त्याने घेतली आहे. गोष्टरंग बुंग. . . बँग. . . बुंग ।।ऋषिकेश प्रधान।।
मुंबई दौरा
मुंबईत जुहू येथे Ecole Mondiale International School मध्ये गोष्टरंग टीमने गोष्टी सादर केल्या. नेहमी गावांत किंवा छोट्या शहरांत प्रयोग करण्याची सवय असलेल्या फेलोजसाठी या शाळेतले प्रेक्षक जरा वेगळे होते. पण शेवटी मुलंच ती.. भरभरून हसली, उत्साहाने प्रतिसाद दिला.. आणि कार्यक्रम संपल्यावर मुलांनी आणि शिक्षकांनी आग्रह केल्यामुळे सगळ्यांनी मिळून गोष्टरंगच्या गाण्यावर नाचही केला! #Goshtarang Ecole Mondiale
















































