गोष्टरंग फेलोशिपबद्दल थोडेसे – मुलांमधे लहान वयातच वाचनाची आवड विकसित व्हावी म्हणून क्वेस्टतर्फे नेहमीच प्रयत्न केले जातात. त्यातलाच एक अभिनव उपक्रम म्हणजे ‘गोष्टरंग फेलोशिप’. या फेलोशिपसाठी निवडलेले तरुण रंगकर्मी मुलांसाठी मराठीत गोष्टी सादर करतात. गोष्ट प्रभावीपणे सादर करणे हे एक कौशल्य आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये असे सादरीकरण मुलांना अभावानेच पाहायला मिळते. फेलोज गोष्टी सांगतात आणि त्या गोष्टींच्या पुस्तकांवर आधारित काही कृती आणि खेळसुद्धा घेतात. त्यामुळे पुस्तकातली गोष्ट जिवंत होते, मुलांचे मनोरंजन तर होतेच, शिवाय त्यांना वाचन-लेखनाची गोडीही लागते. हा उपक्रम शिक्षणशास्त्रातील संशोधनावर आधारित आहे.
हा उपक्रम २०१६ साली सुरू झाला. आत्तापर्यंत ३५ तरुण-तरुणींना गोष्टरंग फेलोशिप मिळालेली आहे. महाराष्ट्राच्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये ३००+ शाळांमध्ये गोष्टरंगचे प्रयोग झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन माध्यमातूनही फेलोज गोष्टी सांगत होते. आजवर १,०००००+ हून अधिक मुलांपर्यंत या गोष्टी पोचल्या आहेत. काही शहरांत आणि गावांत सार्वजनिक कार्यक्रमातही गोष्टरंगचे सादरीकरण झाले आहे, आणि त्याद्वारे अक्षरशः लाखो लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे.

गोष्टरंग फेलोज कोण आहेत? ते फेलोशिपमध्ये काय शिकतात?
गोष्टरंग फेलोशिपसाठी महाराष्ट्रभरातून अर्ज येतात. नाट्यक्षेत्रात प्रशिक्षण घेतलेले रंगकर्मी किंवा नाटकात ऑन स्टेज / बॅक स्टेज काम करण्याचा अनुभव असलेले तरुण-तरुणी या फेलोशिपमध्ये सहभागी होऊ शकतात. अर्जदारांमधून ५ किंवा ६ फेलोज निवडले जातात. ते क्वेस्टच्या सोनाळे (वाडा तालुका) इथल्या सेंटरवर राहून मुलांसाठी गोष्टी सादर करण्याचे तंत्र शिकतात. त्यासोबत अप्लाइड थिएटर, लहान वयातली साक्षरता अशा अनेक विषयांची त्यांना ओळख करून दिली जाते. अनुभवी दिग्दर्शक त्यांना मार्गदर्शन करतात आणि गोष्टी बसवतात. या गोष्टींचे प्रयोग वाडा परिसरातल्या आश्रम शाळा आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये होतात आणि क्वेस्टचे काम ज्या जिल्ह्यांमध्ये सुरू असेल तिथेही या गोष्टी सादर करण्याची संधि फेलोजना मिळते.

गोष्टरंग २०२४-२५
गोष्टरंग २०२४-२५ मधील फेलोज बद्दल माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा
गोष्टरंग २०२४-२५ मधील सादर झालेल्या गोष्टींच्या माहिती साठी येथे क्लिक करा
क्वेस्टची थोडक्यात माहिती – ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून गेली १७ वर्षे क्वेस्टचे काम चालू आहे. क्वेस्टच्या कामाचा लाभ आजवर सुमारे ३,२०,०००+ मुलांना, ११,१४८+ शिक्षणकर्मींना, ६,०००+ शाळा व आंगणवड्यांना आणि ४५००+ पालकांना मिळाला आहे. भाषेचे वाचन-लेखन आणि गणित हे विषय क्वेस्टतर्फे प्रामुख्याने हाताळले जातात. क्वेस्ट बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
संपर्क – क्वॉलिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्वेस्ट)
233, वडवली रोड, सोनाळे बु.,
तालुका – वाडा, जिल्हा – पालघर – 421203
देवदास उचले – +91 9657442957 । devdas.uchale@quest.org.in
क्वेस्ट वेबसाईट – www.quest.org.in

